मराठी कथेत सशक्त कथाबीजाच्या जोरावर कथेचे आकाश पेलून मानवी मनाच्या हळव्या कोपर्यांना स्पर्श करत वाचकांना खिळवून ठेवणार्या कथाकारांची परंपरा मोठी आहे.
या परंपरेला स्पर्श करणार्या कथा ‘बायडा आणि इतर कथा’या कथासंग्रहात आहेत. मानवी जीवनातील नात्यांची नाळ मानवी मूल्यांवरती पेलून धरण्याचे काम या कथासंग्रहातील पात्रं अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने करताना दिसतात.
आधुनिकीकरणाच्या नावाखाली भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा बोजवारा उडालेला असताना आजही ग्रामीण
जीवनात दिसणार्या भारतीय परंपरेचे डॉ. शांताराम डफळ यांनी संवेदनशीलतेने चित्रण केले आहे.
निसर्गातील भावभावनांचा मानवी जगण्याशी संदर्भ जोडल्याचे कथांमधून दिसते. कथांमधील पात्र सामान्यांच्या यातनापूर्ण
हतबलतेला ओलांडून परिस्थितीच्या आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जातात व सकारात्मकतेला पेलून मानवी जीवनाला नव्या प्रकाशाची वाट दाखवतात.
मानवी समाजाचे बेगडी रूप, स्त्री मनाचे कंगोरे, निसर्गासमोरची मानवी हतबलता, व्यवस्थेची उदासीनता, ग्रामीण जीवनाच्या
संघर्षातून पुन्हा नव्याने उभे राहण्याची धडपड या हृदयस्पर्शी कथांमधून दिसते. वाचक या कथांचे नक्कीच स्वागत करतील.