आपण आईची महती कितीही गात असलो तरी आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या वडिलांची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. आपल्या वडिलांच्या सवयी, त्यांचे बालपण आणि त्यांची जडणघडण, त्यांचे संस्कार, त्यांचे विचार या साऱ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग असतात.
प्राध्यापक आणि लेखक हनुमंत भवारी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या मनात आलेल्या भावना, त्यांच्या आणि इतरांच्या मनातील वडिलांबद्दलच्या भावना कविता रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या संग्रहात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन विभाग मिळून १७ कविता आहेत. कवितेत ठिकठिकाणी वापरण्यात आलेल्या ग्रामीण तसेच बोलीभाषेतील शब्द आणि वाक्प्रचारांचे योग्य अर्थ वाचकाला कळावेत यासाठी एक शब्दार्थ / सूचीही या कवितासंग्रहात आहे.
या पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना प्रस्तावनेत ते म्हणतात, “आज बाबा आमच्यात नाहीत. त्यांचं हे उणेपण प्रचंड सतावतं. क्षणोक्षणी त्यांची आठवण येते. त्यांच्यानंतर त्यांनी जोडलेल्या त्यांच्या अनेक मित्रांना मी जाऊन भेटलो. त्यांच्याशी गप्पा मारल्या. प्रत्येकाच्या मनात आजही बाबांबद्दलचं प्रेम ओसंडून वाहत होतं. त्यातील काही अनुभवांना मी शब्दरूप देण्याचा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.” आपल्या वडिलांच्या विचारांबद्दल एक कृतज्ञता, त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम हे सारे या कवितांमधून ओतप्रोत भरले आहे.
लेखकाविषयी:
प्रा. हनुमंत भवारी हे प्राध्यापक, लेखक असून पाबळ येथील एका नामांकित महाविद्यालयात ते कार्यरत आहेत. हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे. याआधीच्या पुस्तकांमध्ये एक कवितासंग्रह आणि काही समीक्षात्मक पुस्तकांचा समावेश आहे. याबरोबरच ते महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्याने देतात, वर्तमानपत्रातून लेखनकाव्यसंमेलनातून कविता सादरीकरण व सूत्रसंचालन करतात. आजवर त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!