आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती, वास्तुरचना यांच्याबरोबरच मानवी जीवन सुलभ व्हावे यासाठी गृहनिर्मिती व बांधकामनिर्मितीमध्ये काळानुसार बदल होत गेले. त्यामध्ये रेल्वेमार्ग, बोगदे, विमानतळ यापासून ते पर्यावरणपूरक घरांची रचना, निवासव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन यांसह अगदी कचरा व्यवस्थापन ते आरामदायी जीवनशैली यासाठी बांधकाम क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचा वापर केला गेला. हा बदल नेमका कसा झाला, याची अतिशय रंजक आणि वाचकांना सदैव उपयुक्त ठरणारी माहिती पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.
बांधकाम विश्वाशी संबधित अनेक नव्या कल्पना गेल्या काही वर्षात विकसित झाल्या. तरीही प्राचीन बांधकाम शैली आणि निर्मितीमधील सर्वसामान्य जिज्ञासा कायम राहिली. उंच पिरॅमिड, अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, चायनाची भिंत याविषयीचे औत्सुक्य आजही कायम आहे. तसेच अलीकडच्या काळात उभारण्यात आलेला भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी, बुर्ज-अल-अरब कसे उभारले गेले, याविषयीही उत्सुकता असते. त्याविषयी दिलेली माहिती ज्ञानामध्ये भर घालणारी ठरेल.
लेखकाने सोप्या आणि ओघवत्या भाषेत हे लेखन केले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील अनेक संकल्पना नवोदित अभियंत्यांपासून सर्वसामान्य वाचकांना सहजपणे समजतील.
लेखकाविषयी माहिती : लेखक प्रकाश मेढेकर हे स्थापत्य विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी या क्षेत्रात विविध ठिकाणी अधिकारी पदावर काम केले आहे. काही प्रकल्पांवर त्यांनी स्वतः काम केले. त्यांना आलेले अनुभवही त्यांनी लिहिले आहेत. सकाळ प्रकाशनातर्फे मेढेकर यांचे दिशा बांधकाम निर्मितीचे हे पुस्तक यापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. त्याला वाचकांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!