दृष्टिकोन ही एक निवड आहे!
“सन १९८५ मध्ये, नकारार्थी विचार मनात ठेवून, निराश होऊन मी एकटाच माझ्या अभ्यासिकेत बसलो होतो.
वकिलीच्या माझ्या व्यवसायात मी जळून खाक झालो होतो आणि मला तसूभरही कल्पना नव्हती की, ही परिस्थिती मी कशी बदलू शकेन.
मला काही ध्येये नव्हती…स्वप्ने नव्हती…माझ्यात ऊर्जाच नव्हती. नंतर मी असा एक शोध लावला की, ज्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली.
मला सकारात्मक सामर्थ्याचा शोध लागला.
जसा मी माझा दृष्टिकोन बदलला तसं मला पूर्ण जगच नव्याने खुलं झालं. मी एवढा उल्हसित झालो होतो की, व्यक्तिगत विकासाच्या तत्त्वांचा मी सखोल अभ्यासच करायला सुरुवात केली. यशाच्या ज्या तत्त्वांनी माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले, त्यासंबंधीची माहिती इतरांना देण्याची मोठी स्वप्ने मी उराशी बाळगायला सुरुवात केली होती. सन १९९२ मध्ये, हे स्वप्न अमलात आणायचे मी ठरविले आणि मी माझी वकिली थांबवून, प्रेरणात्मक व्याख्यान देणारा वक्ता आणि लेखक म्हणून कारकीर्द करायची ठरविले. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करून आणण्याचे आणि यश व पूर्तता याबाबतची नवी उंची गाठण्याचे सामर्थ्य तुमच्यात सुद्धा आहे. तुमची वृत्ती सकारात्मक…नकारात्मक…किंवा त्यादरम्यान कुठेही असली तरी हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसे नियंत्रण ठेवायचे याबाबत मार्ग दाखवेल आणि तुमच्या अविश्वसनीय कुवतीला वाट करून देईल.
या पुस्तकातील १२ प्रकरणे शिकून आणि ती अंगीकारून तुम्ही चैतन्यमय व्हाल..तुम्ही नवीन शक्यता पडताळून पहायला सुरुवात कराल…तुमच्या विलक्षण गुणवत्तेला विकसित करण्यासाठी तुम्ही कृतिशील व्हाल…आणि तुम्ही असामान्य परिणाम साध्य कराल.
हे पुस्तक असे आहे की, जे तुम्हाला तुमची वृत्ती बदलायला आणि तुमच्या जीवनात बदल घडवून आणायला शिकवेल!”
– जेफ केलर