या कादंबरीची नायिका हे अस्किदिल आणि कादंबरीतील काळ आहे अठराव्या शतकातील सुलतान अब्दुल हमीद प्रथम यांच्या राजवटीचा. सुलतान, त्यांच्या जनान्यातील अस्किदिल नावाची सुंदर दासी आणि त्यांचा मुख्य खोजा कफूर या तिघांच्या नजरेतून कादंबरी उलगडत जाते. सुलतानांच्या अगणित स्त्रियांपैकी एक अस्किदिल सुलतानाच्या प्रेमात पडते, परंतु तिच्या प्रेमाला सुलतान तेवढ्या उत्कटपणे प्रतिसाद देऊ शकत नाही त्यांचा खोजा कफूर हाही अस्किदिलच्या प्रेमात असतो. कहानी घडताघडता साम्राज्याला भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक समस्यांशी आपला परिचय होतो. ओटोमान राज्यवाड्यातील आणि तिथल्या जनानखान्यातील जीवनाचे वर्णन ह्या कादंबरीत इतके रंगीबेरंगी कलात्मक रंगवलेले आहे की आपणही त्या झगमगाटी, दिमाखदार वातावरणात रंगून जातो.