अशोक.... सम्राट अशोक... आपल्या भारताचा पहिला ज्ञात चक्रवर्ति सम्राट! राजमुद्रेवरील अशोकचक्र ,अशोकस्तंभ सिंहमुद्रा यामुळे भारताची ओळख दाखवणारा!
अशा या आपल्या पूर्वजाची ओळखसुद्धा आपल्याला १९ व्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत नव्हती हे जेव्हा समजते तेव्हा आश्चर्या चा धक्का बसतो नां? तोपर्यंत त्याचे शिलालेख स्तंभ लोकांनी धोब्याचे दगड म्हणून वापरले खडबडीत पृष्ठभागावर कपडे चांगले घासले जातात म्हणून. गटारे ओलांडण्यासाठी गटारांवर ठेवले गेले. इमारतीच्या किंवा धरणांच्या पायात घातले गेले ,पायऱ्या बनवल्या गेल्या. हे वाचून आपण किती अस्वस्थ होतो नां? पण काय करणार? हे वापरणाऱ्यांना तेव्हा अशोक हे नाव दूरान्वयाने ही माहित नव्हते .हा त्यांचा दोष नाही.
या आपल्या सुपर डुपर आजोबाची आणि आपली ओळख करून द्यायला पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटिश अधिकारीय कारणीभूत आहेत. प्राचीन पुराणे व ग्रंथ सगळे संस्कृतमध्ये आहेत आणि ती वाचता यावीत म्हणून हे लोक संस्कृत शिकले. त्यावर प्रभुत्व मिळवले आणि ते प्राच्यविद्यापंडीतच झाले. इंग्लिश संस्कृत शब्दकोष तयार केले. त्यासाठी दूरदूर जंगलात ते राहिले .चालत चालत सगळीकडे शोध घेतले, प्रतिकूल निसर्गात राहिले. हे सर्व करताना ते स्वतःबरोबर चित्रकारां चे ताफे घेऊन जात. हे चित्रकार त्या त्या इमारतींची, शिल्पांची, स्तूपांची लगेच चित्रे काढून ठेवीत. शिलालेखांच्या कॉपी करून ठेवीत. याच लोकांनी भारतीय पुरातत्वशास्त्र जन्माला घातले. एशियाटीक सोसायटीची स्थापना केली. त्यामुळे या सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांचे या बाबतीत आपल्यावर प्रचंड उपकार आहेत.
सर्व भागाचा सर्व्हे करणे, श्रीलंकेत मिळालेले 2 प्राचीन ग्रंथ महावंस आणि दिपवंस तसेच कथा सरीतसागर , पुराणे यातील पुरावे , प्रत्यक्षात मिळालेले पुरावे याचा तौलनिक अभ्यास करणे, उत्खननात सापडलेले स्तंभ, शिलालेख यांचे वर्गीकरण,ब्राह्मी भाषा डिकोड करणे हे सर्व सर्व या गोऱ्या प्राच्य विद्या पंडितांनी केले.विल्यम जोन्स, जेम्स प्रिन्सेप, अलेक्झांडर कनिंगहॅम हे यातील अग्रणी!
ही अशोकाची शोधकथा आपल्याला भारत,ग्रीस,इजिप्तच्या काना कोपऱ्यात हिंडवून आणते.अलेक्झांडर ,चंद्रगुप्त,चाणक्य,फा हाएन, हुएन त्संग हर्षवर्धन,सातवाहन,गुप्त सगळे सगळे आपल्याला भेटतात आणि खूप जवळचे, ओळखीचेच वाटायला लागतात. खूप ठिकाणी ' कहानी मे ट्विस्ट ' आले आहेत.इथे डॅन ब्राऊन च्या थरारपटांची आठवण येते आणि नकळत आपण ही त्यातील एक सोंगटी बनून जातो. चंद्रगुप्ताच्या मुलगा बिंदुसार ,त्याचा मुलगा अशोक . अशोकला बऱ्याच राण्या पण त्यातील प्रमुख आहे असंधीमित्रा( असंधीमित्ता )जिची मुले महिंद्रा आणि संघमित्रा ( हे पुढे सिलोन ला बौद्ध धर्म प्रसारासाठी जातात) ,दुसरी राणी पद्मावती - हीचा मुलगा अतिशय सुंदर डोळ्यांचा म्हणून कुणाल नाव असलेला,आणि तिसरी राणी तिष्यरक्षिता ( ही आपल्या हिंदी सिनेमातील ललिता पवार ,शशिकला, मनोरमा इ. झाडून साऱ्या vamps चा अर्क होती) ही तिष्यरक्षिता कुणालाच्या प्रेमात पडते पण कुणाल तिला आई म्हणून हाक मारतो तर ही गेम खेळते आणि ध चा मा करून अशोका कडून कुणाल चे डोळे काढून टाकते. सम्राट अशोक त्या बोधिवृक्षाच्या इतक्या प्रेमात पडलेला असतो की त्याच्यापाशी जाऊन तो तासनतास त्याच्याकडे बघत बसायचा. ( हा एक प्रकारचा मानसिक आजार ही असू शकतो) त्यामुळे राज्य कारभाराकडे दुर्लक्ष्य होतंय हे पाहून तिष्यरक्षिता बोधिवृक्ष उखडून टाकते आणि ते पाहून राजाला जोरात चक्कर येते , तो जमिनीवर पडता पडता राण्या त्याला सावरतात. हे सर्व सांचीच्या स्तूपातील तोरण पट्ट्यांवर कोरलेले आहे.कलिंगाच्या लढाईनंतर अशोकला झालेला पश्चाताप, बौद्ध धर्माकडे वाढलेला कल,धर्माप्रति वाढलेली श्रद्धा, त्यातून आदर्श राजा,आदर्श प्रजा आदर्श धर्म सत्तेवर आणण्याची कळकळ हे सर्व त्यांनी लिहून ठेवलेल्या डायरीतून आपल्याला कळते.त्याचे स्तंभलेख ,शिलालेख हे आजकाल च्या डायरी च तर आहेत न ! त्याचे साम्राज्य पार गांधार इजिप्त ग्रीस पर्यंत पसरलेले लिहिलंय त्यात . मांडलिक राजांची नावे आहेत त्यात. असा हा अशोक कुरूप होता, जन्मजात कोरडी रखरखीत त्वचा होती त्याची , बेडौल बुटका मोठ्या डोक्याचा होता. आपला स्पर्श राण्यांना आवडत नाही हे कळल्यावर त्याने आख्खा राणीवसा जाळला होता. तो अतिशय क्रूर होता, नरक यातना देणारे तुरुंग त्याने बांधले होते . तो
' चंड अशोक ' होता. पण बौद्ध धर्म स्वीकार केल्यावर तो एकदम ' धर्म अशोक ' बनतो . हे त्याचे स्थित्यंतर मुळापासून वाचायला जास्त छान वाटते.तो भारताचा सार्वभौम सम्राट झाल्यानंतर च्या त्याच्या शिल्पातील तो एक तेजस्वी रुबाबदार असा शिल्पांकीत केला गेलाय.
गृहकलह तर प्रत्यक्ष अशोकालाही टाळता आला नाही पण तरीही त्याच्या पुढील कित्तेक पिढ्यांनी आणि इतर राजांनी त्याने शिलालेखात सांगितलेले धर्माचरण केले.
त्याच्या प्रत्येक लेखाची सुरुवात ' देवानां पिय पियदस्सी लाजा हेवं आह ' ( देवांना प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणाला ) अशीच आहे . फक्त 2 लेखात अशोक असे नाव आहे. एक ठिकाणी तर अशी ग्राफिटी आहे की ' इथे हा अशोक त्याच्या होणाऱ्या भावी पत्नीला घेऊन आला होता ." सर्व लेखात एकाच आदेश देतोय हा राजा -- " हा प्रियदर्शी राजा सांगतो तसा धर्म सगळ्यांनी पाळा. हे माझे आदेश माझे नातू ,पणतू खापर पणतू पण वाचतील आणि तसेच वागतील अशी आशा आहे."
....आणि ..आज 2300 वर्षे झाली तरी आपण ते वाचत आहोत, कदाचित आचंद्रसूर्य वाचत राहतील आपल्याही पिढ्या ...
अशी ही अशोकाच्या शोधाची कहाणी आपल्याला प्राचीन भारतातून फिरवून आणते.आपण अशा कालखंडात रमून जातो की हुएन त्संग भारतात यायला अजून 800 वर्षे बाकी आहेत.अजून 800 ते 1000 वर्षांचा काळ वेरूळ अजिंठ्याच्या उभारणीसाठी वाट बघायला लावणार आहे. हे संशोधनात्मक आणि तितकेच थरारक पुस्तक लिहिल्याबद्दल चार्ल्स अॅलन आणि ते मायमराठीत आणल्याबद्दल डॉ धनंजय चव्हाण यांचे शतशः आभार !
जरूर वाचा.
पुस्तक-- अशोक, भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध
मूळ लेखक-- चार्ल्स अॅलन
अनुवाद--डॉ धनंजय चव्हाण
Thanks for subscribing!
This email has been registered!