जीवनात बरेच जण मळलेल्या वाटांनीच वाटचाल करतात. स्वत:च्याच पावलांनी नव्या वाटा पाडणारे, हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचणारे अगदी थोडे! या थोड्यांमधलेच काही.... सिंदबादप्रमाणे समुद्र ओलांडून सात सफरी करणारा ‘टिम सेव्हरिन.’ आफ्रिकेतल्या गोम्बे नॅशनल पार्कमध्ये राहून चिंपांझी वानरांवर संशोधन करणारी ‘जेन गुडाल.’ उत्तर ध्रुवाकडील आर्क्टिकच्या ओसाड प्रदेशात प्रवास करणारा ‘फर्ले मोवॅट.’ आफ्रिकेतील टांझानियाच्या लेक मन्यारा नॅशनल पार्कमध्ये जंगली हत्तींच्या कळपात चक्क चार-पाच वर्षे राहणारी ‘ओरिया.’ नाईल नदी तरून जाण्याच्या जिद्दीनं एकाकी प्रवास करणारा ‘कूनो स्टुबेन.’ पक्षिजीवनाचा पन्नास वर्षे अभ्यास करणारे पक्षिनिरीक्षक ‘सलीम अली.’ फॉरेस्ट खात्यात अधिकारी असूनही झाडांच्या सावलीत वाढलेले आणि उघड्या रानात जन्मलेले निसर्गनादी ‘मारुतराव चितमपल्ली.’