सध्या जवळजवळ सारेच पालक आपल्या मुलांकडे रेसच्या घोड्यांप्रमाणे बघत आहेत. आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर वगैरे व्हायला पाहिजे किंवा जेथे अधिकाधिक पैसा मिळेल अशाच क्षेत्रात गेले पाहिजे. पुष्कळदा तर चांगल्या वाइटाचा, नीती-अनीतीचा विचारही केला जात नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मुलांची बौद्धिक कुवत किती, त्यांच्या स्वातंत्र्याचे आणि इच्छा-आकांक्षांचे काय, असले प्रश्न पालकांच्या डोक्यात येतच नाहीत. परिणामी कौटुंबिक ताणतणाव आणि कमालीची विपन्नावस्था निर्माण होते. अशी परिस्थिती कुठल्याही समाजासाठी निश्चितच चांगली नाही.
केवळ ‘शिक्षण एके शिक्षण’ ही गोष्ट महत्त्वाची नसते, तर मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तरच त्या शिक्षणाला अर्थ प्राप्त होतो. मुलांचे यश म्हणजे अपघात किंवा चमत्कार नाही, तर ते संस्कारांचे फळ आहे. नुसत्या सुविधा पुरविल्या म्हणजे मुलांचा विकास होत नाही, तर स्वातंत्र्यात आणि प्रसन्न वातावरणात मुले घडतात. सध्या सगळा समाजच स्वयंकेंद्रित झाला आहे. अशा परिस्थितीत मुलांमध्ये सामाजिक जाणिवा संस्करित केल्या पाहिजेत यावर प्रस्तुत पुस्तकात भर दिलेला आहे. मला वाटते आजच्या काळात ही बाब फार-फार महत्त्वाची आहे.
एकंदरीत प्रस्तुत पुस्तकात बालविकास केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. त्या दृष्टीने घर, शाळा, पालक, शिक्षक, संस्कार, नैतिकता, सामाजिक जाणीव, व्यक्तिमत्त्वविकास, त्यातील खेळाचे स्थान इ. अनेक बाबींचा विचार सौ. पुष्पा सोळंके यांनी फार विस्ताराने आणि सूक्ष्मपणे केला आहे. त्यामुळेच हे पुस्तक केवळ पालकांनाच नाही, तर मुलांना आणि शिक्षकांनाही मार्गदर्शन करणारे ठरणार आहे.
– डॉ. नागनाथ कोत्तापल्ले