मराठी साहित्याच्या क्षेत्रात ‘अर्वाचीन कवींचा काव्यविचार’ या अतिशय महत्त्वाच्या पण आजवर अलक्षित राहिलेल्या विषयाची सलग-समग्र आणि संशोधननिष्ठ मांडणी करणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. साधार आणि साक्षेपी विवेचन, उद्बोधक तुलना आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांमुळे या ग्रंथाची महत्ता निश्चितच वाढली आहे. येथे डॉ. हेमंत खडके यांनी म. मो. कुंटे, केशवसुत, भा. रा. तांबे, बी, माधव जूलियन, अनिल या महत्त्वाच्या अर्वाचीन कवींच्या काव्यविचाराची सखोल, सूक्ष्मदर्शी आणि तुलनात्मक मांडणी तर केली आहेच पण त्या काव्यविचाराला प्रभावित करणार्या विविध घटकांची मार्मिक मीमांसाही केली आहे. विषयाचे विवेचन करताना डॉ. खडके यांनी जोपासलेली रसिकता लक्षणीय ठरणारी असून मराठी काव्यविचाराच्या पूर्वपरंपरेचे आणि पार्श्वभूमीचे यथोचित भानही त्यांनी राखले आहे. काव्यविचाराच्या आकलनासाठी आवश्यक त्या संज्ञा-संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी शास्त्रकाट्याची कसोटी स्वीकारली असून ‘काव्यविचार’ ही संकल्पना या ग्रंथाच्या निमित्ताने पहिल्यांदा अधोरेखित होते आहे.
प्रा. वसंत आबाजी डहाके प्रस्तावनेत लिहितात त्याप्रमाणे आधुनिक काव्यविचाराच्या इतिहासाच्या दिशेने डॉ. खडके यांनी टाकलेले हे पाऊल निःसंशय महत्त्वाचे आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!