जगभरातील आणि विशेषत: भारतातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजनिर्मिती हा कळीचा मुद्दा ठरला आहे. साहजिकच विविध ऊर्जास्त्रोतांच्या शक्यताशक्यतेची पडताळणी करणे आवश्यक बाब ठरली आहे. उपलब्ध पर्यायांपैकी अणुऊर्जेच्या पर्यायाची सरकारकडून गंभीर दखल घेतली गेल्याचं दिसत आहे. मात्र या पर्यायाविषयी उलट-सुलट मतं व्यक्त केली जात आहेत. विशेषत: फुकुशिमाच्या घटनेनंतर या पर्यायाविषयी जनतेत मोठा संभ्रम निर्माण होऊन हा पर्याय अधिकच वादग्रस्त झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर सौरव झा यांचं हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं ठरतं.
पुस्तकात अणुऊर्जेसंबंधी उलट-सुलट व साधक-बाधक चर्चा करून लेखकाने त्रयस्थ भूमिकेतून या पर्यायाविषयी माहिती करून दिली आहे.
अणुऊर्जेची शास्त्रीय माहिती, त्याचं तंत्रज्ञान, त्याचं अर्थशास्त्र याविषयी माहिती देऊन लेखकाने फुकुशिमा व चेर्नोबिल घटना, नैसर्गिक संपत्तीची उपलब्धता, भूराजकारण आणि अणुऊर्जेविषयीचं धोरण यांचाही पुस्तकात उहापोह केला आहे. समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन दिलेली ही माहिती सुस्पष्टपणे आणि सुबोध शैलीत मांडली आहे. तसेच सुरक्षा व कचरा व्यवस्थापन (न्युक्लिअर वेस्ट) यांसारख्या लोकमानसात काळजीचा सूर निर्माण करणाऱ्या मुद्यांचीही दखल घेऊन लेखकाने या समस्यांवर नवे उपाय सुचवले आहेत.
भारत-अमेरिका अणुकरार, अणुऊर्जा आणि इतर ऊर्जास्त्रोत यांचं नजीकच्या काळातलं भवितव्य आणि होमी भाभांचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता याबद्दल कुतूहल असलेल्या सर्वांसाठी हे पुस्तक उद्बोधक ठरावे.