सुनीता विल्यम्स हिनं अवकाशातील सहा महिन्यांच्या वास्तव्यात, जगभरातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २९ तास १७ मिनिटांचा स्पेसवॉक करून तिनं महिलांच्या अवकाश प्रवासात विक्रमी नोंद केली आहे. एका असामान्य स्त्रीची ही कथा आहे. समर्पण, निष्ठा, स्पर्धात्मक विचारधारा, आणि सकारात्मक दृष्टीकोणामुळं, पशुवैद्य बनण्याची इच्छा असलेल्या मुलीचं रुपांतर झालं एका यशस्वी अंतराळवीरामध्ये! आणि आता ती झाली आहे एक आदर्श! सुनीता एका प्रेमळ कुटुंबात लहानाची मोठी झाली, सुनीताच्या यशाचा अभिमान बाळगणा-या कुटुंबानं तिच्यातला उपजत गुणांना वाव दिला, पाठिंबा दिला आणि सुनीतानं अपरिमित कष्ट करून उत्तमतेकडे वाटचाल केली. अमेरिकन भूमीची मुल्यं जपणा-या, आणि भारतीयत्वाच्या खुणा दाखवणा-या सुनीताचे वडील डॉ. दीपक पंड्या हे एक नावाजलेले न्युरोअॅनाटामिस्ट, तर आई उर्सालिन बोनी पंड्या या युरोपियन वारसा जपणा-या! सुनीता सागरात रमली आहे, समुद्रतळाशी जाऊन आली आहे, लढाईवर गेली आहे, मानवतावादी मोहिमांसाठी गेली आहे, अवकाशात उसळी मारून पुन्हा पृथ्वीवर विसावली आहे - ती एक चालतीबोलती आख्यायिका आहे.