भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचा आणि तो दूर करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या एकहाती लढ्याचा सर्वांगीण ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कडक पावले उचलण्यासाठी, भ्रष्ट नोकरशहांना लगाम घालण्यासाठी आतापर्यंत कोणती विधेयके आणण्यात आली, नेमके काय प्रयत्न करण्यात आले, याचा इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कायदा आणण्यात ज्यांनी अडथळे आणले त्यांच्याविरुद्ध नागरी समाजाचा असलेला रागसुद्धा येथे उद््धृत करण्यात आला आहे. नागरी समाजाच्या संतापाचे अण्णा हजारे यांनी व्यापक जनआंदोलनात रूपांतर केले. यामुळे यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडणे किती तातडीचे आणि आवश्यक आहे, हे खासदारांना उमगले. भारतातील उच्च स्तरावरील भ्रष्टाचार आणि यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचा आणि लोकांच्या कल्याणाचा कसा लचका तोडला जात आहे, याचा समग्र आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा गंभीर गुन्हा करण्याऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यास सध्याच्या कायद्यात कशा त्रुटी आहेत, यावरही हे पुस्तक झगझगीत प्रकाश टाकते. आधी केले; मग सांगितले, या न्यायाने अण्णांनी आयुष्यभर कार्य केले. ज्या माणसाला स्वत:चे कुटुंब नाही, संपत्ती नाही. बँकेत ठेव नाही, त्याने स्वत:ला ‘फकीर’ म्हणवून घेण्यात काहीही आश्चर्य नाही.