१९८४' आणि 'अॅनिमल फार्म' या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचा लेखक जॉर्ज
ऑर्वेल मृत्यू पावला, त्याला आता सत्तर वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याच्या
कादंबऱ्यांमधून त्याने रेखाटलेले भविष्यातील मानवी समाजाविषयीचे भयस्वप्न
आता वास्तवात उतरते आहे की काय, अशा भीतीने विचारी जगाला ग्रासले
आहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षांत ऑर्वेलची आठवण समकालीन
लोकसंस्कृतीत पुन्हा एकदा जागृत झाली आहे. देशोदेशींच्या अधिकारशहांनी
लोकशाही मार्गातून ऑर्वेलच्या भयस्वप्नाच्या दिशेने प्रवास सुरू
केला असतानाच्या या काळात ऑर्वेलचे स्मरण अपरिहार्य ठरावे.
- राजेश्वरी देशपांडे,
राज्यशास्त्राच्या प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
'टाइम' मॅगझिनने निवडलेल्या इंग्रजी भाषेतील १०० सर्वोत्तम
कादंबऱ्यांमधील एक आणि विसाव्या शतकातील राजकीय उपहासात्मक
सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरी.
शेतात काम करणाऱ्या प्राण्यांनी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या माणूस
मालकाविरुद्ध केलेले बंड आणि त्यानंतर त्यांच्यापैकीच एका जमातीने
त्यांच्यावर केलेले अत्याचार हा एक जागतिक इतिहास आहे.
रशियन क्रांतीने पूर्ण न केलेल्या वचनापासून जॉर्ज ऑर्वेल या कादंबरीची
सुरुवात करतो. मग अतिशय कडवट दृष्टिकोनातून एक भविष्य उभे करतो
आणि आपल्या सामाजिक आणि राजकीय कृतींचे काय भयानक परिणाम
होऊ शकतात, याचे अतिशय स्पष्ट चित्र आपल्यासमोर सादर करतो.
जोनाथन स्विफ्टशी ताकद, कारागिरी आणि नैतिक अधिकार याबाबतींत
बरोबरी करू शकेल अशा फार थोड्या आधुनिक उपहासकारांमध्ये ऑर्वेलचे
नाव घ्यावे लागेल. 'अॅनिमल फार्म'मधील मोजके लेखन आणि कडवट
विनोदामागील तर्कशुद्ध विचार त्याच्या सडेतोड संदेशाला
अधिक चमकदार बनवतात.