सौमित्र यांची कविता नितांत गांभीर्याने लिहिली गेलेली आणि अनुभवांच्या उत्कटतेतून निर्माण झालेली कविता आहे. हे अनुभव जाणवण्यातून त्यांचे स्वतःचे असे काही वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण जाणून घेऊन ते कलात्मक रीतीने व्यक्त करण्याचे कौशल्यही सौमित्र यांच्याजवळ आहे. कॅमेऱ्याने एखाद्या घटनेचे त्या पद्धतीने अनुभव टिपणे, नाट्यप्रवेशाच्या घडणीच्या माध्यमातून एखादा काव्यानुभव उभा करणे किंवा अनुभवाकडे पोर्ट्रेट चित्रणाच्या दृष्टीने पाहणे अशा आगळ्या वेगळ्या पद्धतींनी त्यांच्या काही कविता साकारलेल्या दिसतात. पण अशा काही मोजक्या कविता वगळता बाकीच्या कवितांत त्यांतील अनुभवानुसारच त्या त्या कवितांची अभिव्यक्ती घडलेली आहे. यातून या कवितांचे स्वतंत्रपण मनावर ठसते.
सौमित्र यांचे कवितेसंबंधीचे प्रेम आणि तिच्याशी असलेले त्यांचे प्राणाइतके जवळचे नाते त्यांच्या अनेक ओळींतून प्रकटले आहे. त्याचबरोबर त्यांच्या कवितांत एकरूपतेने मिसळून गेलेले अनेक थोर चित्रकार, लेखक आणि कवी यांचे संदर्भ पाहिले की, विविध कालांसंबंधी जागरूक असलेल्या कवी सौमित्र यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.