कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध असलेले, विक्रमी खपाच्या पुस्तकांचे लेखक शशी थरूर यांनी An Era of Darkness : The British Empire in India
(अंधारयुग : ब्रीटीशांची भारतातील जुलमीराजवट) या खळबळजनक पुस्तकात, ब्रीटिशांच्या जुलमी राजवटीने भारताला कसे उद्ध्वस्त केले ते सखोल आणि अचूक संशोधनातून दाखवून देतात.
नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून ती ब्रीटनला नेणे; भारतीय कापड, जहाजबांधणी, पोलाद अशा उद्योगांचा केलेला विध्वंस; शेती, सिंचन क्षेत्रात घडवून आणलेले नकारात्मक बदल, अशा वेगवेगळ्या मार्गांनी वसाहतवादी ब्रीटिशांनी भारताचे कसे शोषण केले, ते शशी थरूर सिद्ध करतात. भारताला राष्ट्राचे रूप देणे, लोकशाही आणि राजकीय स्वातंत्र्य रुजवणे, कायद्याचे राज्य, रेल्वे आणि टपाल व्यवस्था अशा अनेक चांगल्या गोष्टी ब्रीटिश साम्राज्यामुळे झाल्या, असा युक्तिवाद अनेकदा केला जातो. साम्राज्याच्या बाजूने दिलगिरीच्या सुरात असा युक्तिवाद करणार्या पाश्चात्त्य आणि भारतीय विद्वानांचे दावे थरूर खोडून काढतात. ब्रीटिशांच्या येण्याने इंग्लिश भाषा, चहा आणि क्रिकेट यांचा परिचय होणे एवढाच फायदा भारतीयांना झाला. अर्थातच या बाबींचा परिचय करून देण्यामागे वसाहतीतल्या नागरिकांच्या फायद्याचा विचार नसून वसाहतवाद्यांची सोय हा हेतू होता. भारतीय इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडाविषयी असलेले अनेक गैरसमज उत्तम निवेदनशैली आणि ठाम युक्तिवाद यांच्या आधारे हे पुस्तक खोडून काढते.