बौद्ध, मुस्लिम, पारशी, शीख, जैन, ख्रिश्चन आदी अल्पसंख्याक असणाऱ्या धर्मीयांसाठी राज्य व केंद्र शासनाने विविध योजना व सवलती लागू केल्या आहेत. त्याद्वारे अल्पसंख्याक समुदायाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास व्हावा, त्यांनाही मुख्य प्रवाहात आणावे, हा शासनाचा मुख्य हेतू आहे. ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना साहाय्य, त्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता योजना, मॅट्रिकपूर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक उमेदवारांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, युवक-उद्योजक व नागरिकांसाठी कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच स्वयंसेवी शिक्षण संस्थांमार्फत अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा अनुदान योजना, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, तंत्रनिकेतन संस्था स्थापन करणे, शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता देणे या योजनाही राबवल्या जातात. याबरोबरच महिलांसाठी बचत गट, हेल्पलाइनची सुविधा, महाराष्ट्र राज्य हज समिती, खादिमुल-हुज्जाची निवड, त्यांच्या समस्याबाबत संशोधन, त्यांच्याशी निगडित अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण, त्यांच्या क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध करणे या राज्यशासनामार्फत प्रशासकीय योजनांची इत्थंभूत माहिती या पुस्तकात आहे.
केंद्र शासनातर्फे मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता व साधनाधारित शिष्यवृत्ती योजना, संस्था/शाळांसाठी पायाभूत विकास योजना, अल्पसंख्याकबहुल जिल्हा विकास योजनांची परिपूर्ण माहिती असलेले हे पुस्तक निश्चितच फायदेशीर ठरेल.