सन १८७८ च्या सुमारास काव्येतिहास-संग्रहाने इतिहास-साधन-प्रकाशनाचा पहिला पद्धतशीर पाया घातला. आधुनिक काळातील मराठी इतिहाससाधन-प्रसिद्धीचा तो उष:कालच असल्यामुळे कै. सान्यांनी त्या साधनांचा परिचय करून देताना जुन्या अवघड किंवा अपरिचित शब्दांची शक्य तितकी फोड करून व अर्थाच्या टीपा देऊन ती सुलभ केली. त्यांनी तसे केले नसते तर त्यांनी छापलेल्या बखरी किंवा पत्रे, यादी वगैरे वाचकांना सुबोध झाली नसती. काव्येतिहाससंग्रहाच्या जन्मानंतर खरे, राजवाडे यांचे मराठी इतिहास-साधन-संशोधनाचे प्रचंड उद्योग सुरू झाले आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन मराठी इतिहाससंशोधनाचा एक महान उद्योग महाराष्ट्रात सुरू झाला व आजतागायत तो विविध शाखांनी अगदी भरगच्च झाला आहे. इतका की, मराठी इतिहाससाधन-ग्रंथांची अद्ययावत मोजदाद करावयाची म्हटल्यास ती हजारांनी करावी लागेल.
पटवर्धनांचा कोश फारशी शब्दांपुरता झाला; परंतु मराठीतील शेकडो अपरिचित शब्द आढळत. त्यांचाही अर्थ लागण्याची पंचाईत होई. कारण सर्व ऐतिहासिक साधनांचा उपयोग करून त्यांत आलेल्या कठीण शब्दांचा केलेला असा कोणताच कोश उपलब्ध नव्हता. १९३० साली जी अडचण कायम होती ती आजतागायतही तशी कायम आहे म्हणून ती कायमची दूर करता आली तर पहावी या हेतूने माझ्या या ऐतिहासिक शब्दकोशाचा उपक्रम झालेला आहे
Thanks for subscribing!
This email has been registered!