आद्य व्याकरणकार रावबहादूर दादोबा पांडुरंग तर्खडकरांना ‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हटले जाते ते उचितच आहे. त्यांनी आपल्या वयाच्या बावीस-तेवीस वर्षीच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिले. ते केवळ व्याकरणकार नव्हते, तर उत्तम शिक्षकही होते. त्यांनी व्यक्त केलेले शिक्षणाबाबतचे विचार महनीय आहेत. अहमदनगर आणि ठाण्यात ते डेप्युटी कलेक्टर म्हणून महसूल विभागात कार्यरत होते. त्यांनी मॅजिस्ट्रेटची परीक्षाही दिली होती. कायद्याचा अभ्यास केला. विशेष म्हणजे त्या काळात कोणतेही लॉ कॉलेज अस्तित्वात नव्हते. तत्कालिन मराठी प्रांतातील सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांचे धार्मिक विचार विवेकपूर्ण होते. विविध ग्रंथलेखन आणि काव्यलेखनातून त्यांनी साहित्य क्षेत्राचीही मुशाफिरी केली आहे. चौफेर अभ्यास, संशोधनासाठी आवश्यक असलेली चिकित्सक वृत्ती, इंग्रजीप्रमाणेच संस्कृत, फारसी, तेलुगू, तमिळ आदी भाषांवरील प्रभुत्व अशा अनेक गुणांनी ते मंडित होते. अशा रावबहादूर दादोबांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वाची माहिती नव्या पिढीला व्हावी, ज्यांनी मराठी व्याकरण रचले त्यांचे कृतज्ञ स्मरण राहावे यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिती झाली आहे