आजचं मानवी मन मग ते जगातल्या कोणत्याही भागातलं असो, एका विचित्र पोकळीत गुदमरून तडफडत आहे. निसर्गाप्रमाणे मनुष्याच्या मनालाही श्रद्धांची, मूल्यांची आणि विचारांची पोकळी सहन होत नाही. जुन्या भावनांना आधारभूत असलेल्या श्रद्धा उद्ध्वस्त झाल्यामुळं माणूस आता अनिवार वासनांच्याद्वारे त्यांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरिक शांतीची पोकळी इंद्रियसुखाच्या धुंदीनं भरून काढता येईल, या कल्पनेनं तो वासनातृप्तीच्या रोखाने धावत आहे... अशा पद्धतीनं वि. स. खांडेकरांनी केलेली वर्तमान समाजमनाची चिकित्सा समजून घ्यायची तर या `अज्ञाताच्या महाद्वारात` पाऊल ठेवायलाच हवे. सन १९७० च्या दरम्यानचं हे वैचारिक लेखन पाव शतक उलटून गेलं तरी आजही तंतोतंत लागू कसं पडतं याचं आश्चर्य वाटतं नि विषादही!