आज जगातील बहुतांश देशांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. काही देश अपवादानेच स्त्रीप्रधान आहेत. प्राचीन काळी स्त्रियांकडे समाजाचे नेतृत्व होतं. नेतृत्वासोबतच कुटुबांतील संपत्तीची मालकीही पूर्वी स्त्रियांकडे होती. त्यामुळे त्यांना समाजात आतिशय सन्मानाचे स्थान होते. सक्षमता आणि सन्मान यामुळे स्त्रियांचे शोषण करण्याची कुणाची हिंमत नव्हती. स्त्रीसन्मानाचे प्रतीक म्हणून समाजातील कर्तबगार स्त्रियांना त्यांच्या मृत्युनंतर मातृदेवता मानले जाऊन त्यांची उपासना सुरू झाली. जगभरात मातृदेवतांच्या उपसानांचे अवशेष त्यामुळेच आढळतात. कालांतराने स्त्रीसत्ताक समाजाची पीछेहाट होऊन पुरुषसत्ताक समाज निर्माण झाला. आज सर्वत्र पुरुषी वर्चस्वाचा दिंडीम निनादत आहे. त्यामुळे स्त्रियांना दुय्यम नागरिकत्त्व मिळाल्यासारखे वातावरण जगभर आहे. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे, या मानसिकतेतून पुरुष त्यांच्यावर मालकी हक्क दाखवितात. त्याचप्रमाणे संधी मिळाली की, त्यांच्यावर अत्याचारही करतात. मातृदेवतांच्या उपासनेची परंपरा असलेल्या या देशात हे घडत आहे. मातृदेवतांच्या उपासनांचे रहस्य उलगडायला मदत व्हावी, या हेतूने काही मातृदेवतांच्या परिचय एकत्रपणे करवून देण्याचा हा प्रयत्न मराठी भाषेत पहिल्यांदाच होत आहे. यातून स्त्री सन्मानाचा संस्कार भावी पिढीत रुजावा अशी अपेक्षा आहे. भारतातील प्राचीनतम मातृदेवतांची माहिती या पुस्तकात असल्यामुळे त्याला ' आदिमाया' म्हटले आहे. मातृदेवतांवरील ग्रंथ मालिकेतील हे पहिले पुस्तक आहे.