शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन याचा ग्रामीण संस्कृतीवर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. आठवणी या भरून आलेल्या आभाळासारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा झोडपणारा धुवाधार पाऊस असो, माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो. पावसाचा एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मग भरून आलेल्या आभाळात दाही दिशा लुप्त होतात.