वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये,
वृत्तपत्रांमध्ये आणि आता दूरचित्रवाणी वाहिन्यांवर जेव्हा आपण ज्वालामुखींच्या उद्रेकांची चित्रं पाहतो तेव्हा आपल्याला पर्वत पेटल्याचा भास होतो. या आग ओकणार्या पर्वतांना आपल्या पूर्वजांनी ज्वालामुखी हे नाव दिलं. प्रत्यक्षात ज्वालामुखीतून तप्त शिलारस बाहेर पडतो. हा शिलारस भूपृष्ठाखाली असतो, त्यावेळी त्याच्यावर प्रचंड दाब असतो. हा दाब जेव्हा दूर होतो तेव्हा त्या शिलारसामधील विद्राव्य घटक मोकळे होतात, वायुरूपात ते बाहेर पडतात; त्यांच्या धुराला ज्वालेचं रूप प्राप्त होतंच पण आसपासचे ज्वालाग्राही पदार्थ, वृक्ष हेही पेट घेतात. ज्वालामुखीतून शिलारसाच्या गुणधर्मानुसार काही वेळा अगदी बारीक कण उंच उफाळतात. हेही तप्त असतात. त्यांना ज्वालामुखीय राख असं म्हटलं जातं. काही वेळा शिलारसाचे गोळे हवेत गेल्यावर थंड होऊन तप्त शिळेच्या रूपात खाली येतात. याप्रमाणे स्फोटातून बाहेर पडून उंचावर जाऊन दूरवर पसरणार्या पदार्थांना स्फोट शकली पदार्थ म्हणतात. या पदार्थांचा अभ्यास करून शिलारसाचं स्वरूप कळू शकतं. जेव्हा शिलारस भूपृष्ठाखालीच असतो तेव्हा त्याला ‘मॅग्मा’ असं म्हटलं जातं. यात प्रवाही शिलारसाबरोबर अनेक प्लवनशील पदार्थही असतात. पाण्याची वाफ, सल्फर-डाय-ऑक्साईड वायू, काही वेळा पार्याची संयुगं असे घटक यात असतात; पण ज्यावेळी या शिलारसाला भूपृष्ठावर यायला वाव मिळतो तेव्हा हे असे घटक हवेत मिसळून जातात आणि त्यांच्याशिवाय जो शिलारस उरतो त्याला ‘लाव्हा’ असं म्हटलं जातं.
– प्रस्तुत पुस्तकातून