आपल्याला अणुऊर्जा, अणुबॉम्ब वगैरे शब्दांतून अणू माहीत झालेला आहेच.
या अणूने अनेक ठिकाणी अनेक वेळा गोंधळ घातलेला आहे. त्यात सुद्धा चेर्नोबिल, थ्री माईल आयलँड इथल्या अपघातांची बरीच चर्चा झाली आहे.
या मोठ्या गोष्टी वृत्तपत्रातून गाजतातही.
१६ जुलै १९४५ रोजी पृथ्वीवर झालेला स्फोट ही विसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाची घटना मानावी लागेल,
मात्र ही घटना घडल्यानंतर एका महिन्याने तिचं खरं स्वरूप जगाला कळलं.
दरवर्षी ६ ऑगस्टला हिरोशिमा आणि ९ ऑगस्टला नागासाकी या शहरांचे स्मरण केले जाते.
या शहरांच्या पुण्यतिथीनिमित्त राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ही दोन शहरे अणुबॉम्बनी बेचिराख केल्यावर पुन्हा कशी उभी राहिली याची वर्णनं छापून येतात. इथं मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आठवण करून अश्रू ढाळले जातात.
प्रचंड मोठ्या प्रमाणात भाषणबाजी होते.
याव्यतिरिक्त पहिला अणुबॉम्ब कसा घडविला, याबद्दल अनेक लेख लिहिले जातात आणि जातीलही; पण तो कसा दडवला याची माहिती मात्र सहसा कधी छापली जात नाही.
या पार्श्वभूमीवर आज जागतिक चित्र कसे दिसते ? तर प्रतिवर्षी अण्वस्त्रांची संख्या वाढते आहे.
अणूच्या बाबतीत अनेक छोटे मोठे, प्रसंगी धोकादायक असे प्रसंग गेल्या ४० वर्षांत घडले, ते या पुस्तकात एकत्र मांडले आहेत.
याशिवाय एका विद्यार्थ्याने गंमत म्हणून कॉलेजात अणुबॉम्ब करायचा सैद्धांतिक प्रकल्प हाती घेतला.
तो कसा यशस्वी झाला याची हकीकतही यात दिलीय.
पाकिस्तानसारख्या राष्ट्रांनी त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधल्यानंतरच या प्रकरणाचे गांभीर्य संबंधितांच्या लक्षात आले.
हे पाहून आपण किती धोकादायक आणि स्फोटक परिस्थितीत सध्या राहतो आहोत हे लक्षात येईल.