आधुनिक मराठी साहित्याचा समकालीन सामाजिक स्थितिगतीशी अंत:स्थ आणि खोलवरचा संबंध आहे, यामुळेच आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता यांचे आंतरसंबंध व आंतरक्रिया सुविहितपणे निरखून-तपासूनच या साहित्याचे आस्वादन व मूल्यांकन होऊ शकते. साहित्याचा सामाजिक अनुबंध लक्षात घेतल्याने ज्या मराठी समाजात अन् संस्कृतीत हे साहित्य निर्माण होते आहे, त्यांवरही प्रकाश पडतो. स्वातंत्र्योत्तर काळाच्या खुल्या वातावरणात उद्भवलेल्या सामाजिक चळवळी
आणि त्यांचा साहित्यनिर्मितीवर पडलेला प्रभाव यामुळे साहित्याकडे आता केवळ ‘कलात्म निर्मिती’ म्हणून न पाहता ‘एक सामाजिक -सांस्कृतिक घटना’ म्हणून पाहाणे भाग आहे.
वरील दृष्टीनेच डॉ.मृणालिनी शहा व डॉ. विद्यगौरी टिळक यांनी ‘आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता’ या ग्रंथाचे संपादन केलेले आहे.
दिलीप चित्रे, अरुण टिकेकर, वसंत आबाजी डहाके, नागनाथ कोत्तापल्ले, जयदेव डोळे, हरिश्चंद्र थोरात, राजेंद्र व्होरा इत्यादी सतरा मान्यवरांचे लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. या अभ्यासकांचे हे चिंतन ‘आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता’ या विषयाच्या विचारक्षेत्राला नवे परिमाण व नवी दिशा देणारे आहेत.
मराठीच्या तसेच सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना आणि सामाजिक चळवळीतील विचारवंतांना व कार्यकर्त्यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.
Thanks for subscribing!
This email has been registered!