सतीश आळेकर यांनी १९६८ ते २००५ दरम्यान विविध कारणांनी स्वैर रूपांतरित केलेल्या अन्य लेखकांच्या कलाकृतींवर आधारित एकांकिका या संग्रहात एकत्रित केल्या आहेत.
जॉन मॉर्टिमर या ब्रिटिश नाटककाराच्या ‘द जज्ज’ या नाटकावर आधारित ‘जज्ज’ ही आळेकरांनी लिहिलेली पहिली एकांकिका या संग्रहात वाचायला मिळेल. त्याबरोबरच जर्मन नाटककार टांक्रेड डॉर्त यांच्या ‘द वॉल’ आणि ‘द कर्व्ह’ या दोन एकांकिकांवर आधारित ‘भिंत’ आणि ‘वळण’, ब्रिटिश नाटककार हेरॉल्ड पिंटर यांच्या ‘द डम्ब वेटर’वर आधारित सुपारी, इजिप्शियन नाटककार आल्फ्रेड फराग यांच्या दोन स्वगतांवर आधारित ‘आळशी अत्तरवाल्याची गोष्ट’ आणि ‘नशीबवान बाईचे दोन’, अमेरिकन नाटककार मरे शिगल यांच्या ‘द टायपिस्ट’ या एकांकिकेवर आधारित ‘कर्मचारी’ आणि नाशिकचे लेखक रत्नाकर पटवर्धन यांच्या ‘यमी’ कथेवर आधारित ‘यमूचे रहस्य’ अशा एकूण आठ एकांकिकांचा समावेश या संग्रहात केला आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!