कुसुमाग्रजांनी १९३० ते अखेरपर्यंत (१९९८) असे दीर्घकाळ कवितालेखन केले. १९८० पूर्वीच्या त्यांच्या कवितेने जरी काही वेगळी वळणे घेतलेली होती, तरीही ती ‘विशाखा’च्या प्रभावक्षेत्रातून फारशी मुक्त झालेली नव्हती. स्वातंत्र्य व समतेसाठी संघर्ष, बलीदान, मानवतेची पूजा इत्यादी मूल्यांचाच उद्घोष ती करीत राहिलेली होती.
१९८० नंतरची कविता मात्र कवी कुसुमाग्रजांच्या मानसप्रदेशातील सर्व बिंदुंना स्पर्श करणारी आणि त्याच प्रदेशातील खोलवरचे तळ संशोधिणारी अशी आहे. तिची समाजसन्मुखता जराही कमी झालेली नाही, तिचे ‘‘हजारांसंगे’’ असणारे नातेही संपलेले नाही पण ती आता कुसुमाग्रजांच्या मनाच्या अंतर्मनात जास्त रेंगाळणारी झालेली आहे. संघर्ष, क्रोध, उपहास यांची धार कमी होऊन ती व्यथावेदनांना हळुवारपणे फुंकर घालणारी झालेली आहे. १९८० नंतरची कुसुमाग्रजांची कविता म्हणजे त्यांच्या कविमनाचे ‘उत्तरपर्व’च होय. या ग्रंथात याच उत्तरपर्वाचा डॉ. कमल आहेर-कुवर यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण पण सहृदय वेध आहे. रसिकांना व अभ्यासकांना हा वेध कुसुमाग्रजांच्या कवितेकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल.
Thanks for subscribing!
This email has been registered!