संगीत हे एखाद्या पुरातन पण सतत वाढत्या अजरामर वटवृक्षासारखे आहे. त्याला किती फांद्या आणि पारंब्या फुटत राहतील याला सीमा नाही. ते असीम आनंदाने भरलेले आहे.
रागसंगीताच्या आणि भावशब्द- संगीताच्या परंपरेत महाराष्ट्राने भरीव आणि मोलाची भर घातली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र बहुतेक बाबतीत नेहमीच सर्वसमावेशक राहिलेला आहे. संगीतकलाकारांसाठी रसिक आणि धनिक यांनी महाराष्ट्रात उदार, परंतु विचक्षण असे धोरण ठेवलेले आहे. कोणत्याही नवीन सौंदर्यप्रणालीचे स्वागत आपल्या विचक्षण बुद्धीला साक्षी ठेवून महाराष्ट्र आजवर अतिशय साक्षेपाने आणि उदारमतवादी धोरणाने करत राहिलेला आहे.
या पुस्तकात रागसंगीत, नाट्यसंगीत, लावणी आणि शब्द-भावसंगीत यांचा प्रामुख्याने परामर्श घेतलेला आहे.