मराठी भाषा समृद्ध व ताकदीची भाषा आहे, परंतु विधिशास्त्र (कायदा) या विषयावर आधारित पुस्तके मराठीत फारच कमी आहेत. भारतातील सर्व कायदे इंग्रजीलिखित आहेत. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे सर्व व्यवहारही इंग्रजीतच चालतात. त्यामुळे साहजिकच कायद्यावरील मान्यताप्राप्त पुस्तके इंग्रजीमध्येच जास्त आहेत.
पण शासनाचे सर्व व्यवहार मराठीतही व्हावेत, असे धोरण गेल्या काही वर्षांपासून मान्य झाले आहे. त्या बाबतीत नियमही झाले आहेत. त्यामुळे आता मराठीतूनही कायदे प्रसिद्ध होत आहेत. जिल्हा पातळीपर्यंतचे अनेक न्यायाधीश काही निकालपत्रे मराठीत तयार करत आहेत. अनेक न्यायालयांत तोंडी पुरावा नोंदवण्याचे कामही मराठीत चालते.
या पार्श्वभूमीचा विचार केल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द वापरण्यासाठी ‘कायदा’ या विषयाचा संज्ञाकोश आवश्यक ठरतो. याच हेतूने डॉ. बी. आर. जोशी यांनी या कोशाची रचना केली आहे.
शासनकर्ते, न्यायाधीश, वकील, प्रसारमाध्यमे, संशोधक व कायदा शिकणारे विद्यार्थी या सर्वांच्या दृष्टीने हा कोश अतिशय उपयुक्त आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!