अविरतपणे किनार्यावर येऊन आपटणार्या आणि गूढ आवाज करीत फुटणार्या, फेसाळणार्या समुद्र लाटांचं मला लहानपणापासूनच विलक्षण आकर्षण आहे! कदाचित, ते तसं अनेकांना असेल. पण मला वाटणारं आकर्षण हे, समुद्राबद्दल वाटणारी एक अतर्क्य अशी ओढ आहे, याची मला खात्रीच आहे़.
मनाच्या एका कोपर्यात त्याची जागा निश्चित आहे. कधीही डोळे मिटून शांत बसलो तरी घोंघावणार्या वार्याबरोबर जिवाच्या आकांताने किनार्याकडे येणार्या आणि सर्वशक्तिनिशी आपटून फुटून फेसाळणार्या लाटाच मनाचा ताबा घेतात!
या मोहमयी, गूढरम्य किनार्यावर अनेक ठिकाणी वास्तव्य केलं. निसर्गाच्या या अनाकलीय आविष्काराचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची रहस्यं उलगडली असं वाटलं तेव्हा आनंदानं हुरळून गेलो. त्याने किनार्यावर जतन करून ठेवलेले, निर्माण केलेले भूआकार, भूरूपं पाहिली, शोधली आणि अभ्यासली तेव्हा त्यांच्या विलक्षण ताकदीने भारावून गेलो.
वेडपिसं करणार्या, विलक्षण सुंदर आणि मनस्वी किनार्याच्या या समुद्रशोधाची ही संशोधन कथा!
Thanks for subscribing!
This email has been registered!