‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ ही गोनीदांची अगदी वेगळी कादंबरी. अर्धशतकापूर्वी भाकडा-नंगल धरण प्रकल्पावर लिहिलेली. मराठी साहित्यविश्वात अपवादात्मक म्हणावी अशी.
गोनीदांना जसे जुन्याचे आकर्षण तसे नव्याविषयी कुतूहल. नवनिर्माणाविषयी आंतरिक ओढ. साहजिकच भाकडा-नंगल धरण प्रकल्प हा त्यांना कादंबरीचा विषय वाटला. सत्य आणि कल्पिताचा सुरेख संगम साधून कादंबरी लिहिता येईल हे त्यांच्या प्रतिभेला जाणवलं.
त्यांच्या नवनिर्माणाच्या कुतुहलामागे होतं, त्यांचं भारतीय संस्कृतीविषयीचं प्रेम. हिमालयाच्या त्या भागातील माणसांचं भावजीवन त्यांनी जाणून घेतलं. त्यांच्या परंपरा, त्यांच्या रीतीभाती, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांच्या अस्मिता असं सगळं अनुभवलं.
भगीरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली. गंगेबरोबर शतलज नदीही भगवान शंकराच्या जटेतून प्रकट झालेली एक अवखळ धारा. तिला बांध घालून अडविण्याचा भगीरथ प्रयत्न म्हणजे भाकडा-नंगलची अभूतपूर्व निर्मिती. नव्या भारताचा हा प्रचंड प्रकल्प. महानिर्माण. ते केलं भगीरथाचा वारसा सांगणाऱ्या शेकडो तंत्रज्ञांनी आणि हजारो मजूर-कामगारांनी. ते सगळे ‘भगीरथाचे पुत्र’.
Thanks for subscribing!
This email has been registered!